तुम्हाला “जंगल सफारी” म्हणायचे आहे का? एका पुणेकरांनी मला कुजकटपणे विचारलं. मी तितक्याच कुजकटपणे (मी पण पुणेकर) म्हणालो, तुम्ही “सिंदबादच्या सफरी” वाचल्या का हो लहानपणी?

असो, विषय होता महाराष्ट्रातील जंगलांचा आणि आजवर त्या जंगलातून फिरण्याच्या मला लागलेल्या नादाचा. एखादा पायलट कसा त्याचा Flying Time अभिमानानं सांगतो, तसं काहीसं मी माझा Jungle Time सांगतो. आजवर मी साधारण १८० तास जंगलातून भटकलो आहे. ही जंगले म्हणजे महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प. दऱ्या- खोऱ्यातून भटकण्याचा काळ ह्यात मी जोडला नाही.
त्यात काय तीर मारले? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मेलं त्या जीप मध्ये बसायचं आणि हिंडायचं. बरोबर!!! मुद्दा एकदम बरोबर आहे. पण एकदा करून बघितलं आहे का? महाराष्ट्रातील आतापर्यंत सगळे व्याघ्र प्रकल्प हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत. ताडोबा, यावल, मेळघाट, नागझिरा, बोर, टिपेश्वर, उमरेड, पेंच. मुद्दा हा आहे कि ४ तास जीप मध्ये बसायला जय्यत तयारी करावी लागते, आणि त्यात आपण पडलो नोकरदार वर्गातील माणसे.

नोकरी करणाऱ्या संसारी माणसाला २ गोष्टींची नेहमीच भ्रांत असते. पैसा आणि सुट्ट्या. त्या मुळे प्रत्येक सफर कमीत कमी वेळात आणि पैशात करणे हे काय ते आपले कौशल्य. परंतु एकदा का जीप मध्ये बसलो कि त्या ४ तासात आपण काय अनुभवतो हे आपलं नशीब.
पण माझ्या असं लक्षात आलं आहे कि अनुभवायचं काय हे पण कळणे आवश्यक आहे. तुम्हाला किती जरी हवं असलं तरी व्याघ्र प्रकल्पात प्रत्येक वळणावर वाघ बसलेला नसतो. तुम्हाला जर जंगल आणि जनावरांवर प्रेम असेल तरच आपले कष्टाचे पैसे त्या सफरी मध्ये गुंतवा. हो जर फुकट लोकांच्या देणग्या किंवा तळतळाट उडवायचा असेल तर मग लाल पिवळे कपडे घालून केस मोकळे, चेहेऱ्याचं decoration करून तुम्ही सेल्फी मारत जंगलात हिंडू शकता.

तर, सगळे जंगल साधारणपणे जून १५ ते ऑक्टोबर १५ बंद असतात. प्राण्यांसाठी नाही हो आपल्या सारख्या चांगल्या पर्यटकांसाठी. प्रत्येक ऋतूत जंगल वेगळं दिसतं. ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये भरपूर पाणी असतं. जंगलातल्या काही वाटा अजून बंद असतात, सगळं एकदम हिरवं गार असतं. प्राणी दिसणं फार अवघड. पण त्या चिखलातून वाट काढत guide आणि driver तुम्हाला जंगलात प्राणी दाखवण्याचा जो प्रयत्न करतात तो वाखाणण्यासारखा असतो. एक गोष्ट मात्र भारी असते. ह्या वेळी गाड्या जंगलात कमी असतात आणि धूळ उडत नाही. एक ओला सुवास जंगलात दरवळत असतो. एखादी पावसाची सर आलीच तर समोर पावसात भिजणारे प्राणी आणि त्या क्षणाला असलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया बघायची मजाच वेगळी.

डिसेंबर ते फेब्रुवारीचा साधारण दुसरा आठवडा. थंडी मरणाची. कानटोपी, ३ ,४ एकावर एक कपडे, हातमोजे, कानात कापूस इतकं सगळं स्वतःचं कौतुक करून सुद्धा कुठून तरी गार वारा त्याचं काम नेटानी करत असतोच. पण अश्यातच कोवळं ऊन पडतं. त्या जंगलाच्या अंधारलेल्या वाटा कोवळ्या उन्हाने उजळून निघतात. हळूहळू जंगलाची ऊब जाणवू लागते. सागवान, बांबू, पळस, मोह आणि अनेक उंचच्या उंच झाडांना भेदून सूर्य प्रकाश तळ्यावर पडतो आणि मोत्याच्या माळेसारख जंगल लखलखू लागत. काही वेळा धुक्याची मस्त दुलई ह्या जंगलात पसरते आणि आपले डोळे स्थिरावणाच्या आधीच guide एकदम गाडी थांबवतो आणि फक्त नजरेने आणि बोटाने खुणावतो. तो पट्टेरी वाघ, आपले निर्विवाद वर्चस्व दाखवत, ऎटीत (IT नाही) बसलेला असतो. आपल्या हृदयाचा ठोका चुकल्या शिवाय रहात नाही.

“नसीब मेहेरबान तो गधा पैलवान” ह्या म्हणीचा साक्षात्कार काही वेळा होतो…पहिल्या वळणावर वाघ, पुढच्या वळणावर बिबट्या, अजून थोडं पुढे गेलं कि वाघीण पिल्लांसोबत असं एकाच सफारीत एकामागून एक घटना घडतात. तसंच “फुटकं नशीब” म्हणजे काय ह्याची अनुभूती पण बरेच वेळा येते. जंगलातलं एक पान सुद्धा हलत नाही. थंडी इतकी कि लाकडांच्या वखारीत लाकडं रचलेली असतात तशी काहीशी परिस्थिती आपल्या हाडांची होते.

फेब्रुवारीचे शेवटचे दोन आठवडे आणि मार्चचे पहिले दोन आठवडे. होळी पासून ते पाडव्यापर्यंत जंगल एकदमच सुंदर भासतं. मान्सून जर सरासरी झाला असेल तर जंगलात अजून पाणी मुबलक असतं. प्राण्यांची वणवण होत नसली तरी अस्वल, बिबटे, हरणांचे कळप ह्यांना आपली गाडी आडवी जातेच. कुठे कोतवाल आपला चुणचुणीतपणा दाखवतो, तर घुबड आळश्या सारखा एकाच फांदीवर डुलक्या घेत दिवसभर बसलेला असतो. अचानक, एखादे गरुड पायात साप पकडून फांदीवर थाटात बसून त्या सापाचा फडशा पाडतो. मोराचा पिसारा परत एकदा भरगच्च दिसू लागतो. ह्या सगळ्यांमध्ये फुलझाडं पण मागे नसतात. त्यावर फुलपाखरे आणि मधमाश्या आपल्या दिनचर्येत व्यस्त असतात. अश्या सगळ्यांनी जंगल एकदम भरलेलं वाटतं.

एप्रिल नंतर पहिल्या सरी पर्यंत त्या रुक्ष जंगलाची अवस्था पाहवत नाही. सकाळी ५:३० ते ८ आणि संध्याकाळी ५:४५ ते ६:३० इतकीच काय ती हालचाल. बाकीच्या वेळी वाघोबा पाणवठ्यावर किंवा झाडांच्या सावलीत शांत पडून शरीर थंड ठेवायचा प्रयत्न करतो. वाघोबाच काय तुम्हाला पण १० नंतर अवघडल्यासारखं होतं. प्राणी भरपूर दिसतात. गवे, रानडुकरं, सांबर, तळ्याकाठी मगरी इ. पैलवान नशीब असेल तर शिकार करताना वाघ, बिबट्या किंवा कोल्हे.
खरं सांगू का श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन्हीचा समन्वय घडवून आणलात तर नशीब पैलवान असतेच. अनुभव घेण्याची तयारी पाहिजे. प्रत्येक सफरीत जंगल तुम्हाला नवीन गोष्ट सांगते. अगदी आजी आजोबांच्या मांडीवर डोक ठेवून गोष्ट ऐकत लहानपणी झोपून जायचा ना, तसंच काहीसं परत अनुभवाल. खरं सांगतो गड्यांनो, हा नादच खुळा!!!

10 Comments
Brilliant and शहारे आणारा लेख!!!!!
Mastach lihilay
बेस्ट रे
खुप छान लिहीलयस दादा
अप्रतिम वर्णन आहे जंगलाचं
छान लिहिलं आहेस. आवडलं. हा नादच खुळा हे १००% खरं. पुढच्या जंगल मोहिमेची तयारी, चालू असलेल्या मोहिमेच्या शेवटच्या फेरीलाच सुरू झालेली असते !!!🙂
Real experienced, it’s not only storytell but real true nature with phantastic photo shoot.all the best Bhushan.
Very good Bhushan. Keep it up. And may God bless you.
Thanks Buddy!!!
Beautiful pictures and your writing is also mesmerising… thank you 🙏
Thank You